Ad will apear here
Next
रायाजीराव जाधवराव


जिजाऊंचे वडील लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील मातब्बर व पराक्रमी सरदार होते. १६२९मध्ये देवगिरीच्या किल्ल्यात बुरा निजामशहा तिसरा ह्याने केवळ संशयावरून लखुजीराव जाधवराव, त्यांचे पुत्र रघुजी व अचलोजी आणि लखुजींचे नातू यशवंतराव यांची हत्या केली. जिजाऊंचे जन्मदाते व दोन भाऊ, भाचा ठार झाले. बंद झालेले माहेर पुढे संपूर्ण उद्ध्वस्त झाले. जिजाऊ व शिवाजीराजे पुढे दोन वर्षांनी सिंदखेडला आले. लखुजीराजे यांच्या मृत्यूनंतर पुढे जाधव घराण्यातील वीर पुरुष व स्त्रियांनी स्वराज्यासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले.  

जिजाऊंचे ज्येष्ठ पुत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांच्याबरोबर कनकगिरीच्या लढाईत लखुजीराजे यांचे नातू सृजनसिंह ऊर्फ संताजी जाधव ठार झाले होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मदत म्हणून जाधवांकडील लोकांना जिजाऊसाहेबांनी आपल्या सोबत आणले होते. 

संताजी जाधवांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शंभूसिंह जाधवराव, दत्ताजी जाधवरावांचा मुलगा ठाकूरजी यांना जिजाऊंनी आपल्याबरोबर राजगडावर आणले होते. मोठ्या प्रेमाने आऊसाहेबांनी त्यांचा सांभाळ केला होता. शंभूसिंह जाधवराव स्वराज्यनिर्मितीच्या कामासाठी छत्रपती शिवाजीराजांच्या बरोबर होते. त्यांनी राजांबरोबर अत्यंत मोलाचे कार्य केले. 

अफजलखानाच्या वधाच्या वेळी महाराजांच्या सोबत शंभूसिंह जाधवराव होते. सिद्दी जौहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला, तेव्हा महाराजांना विशाळगडावर पोहोचवण्याचे अत्यंत जिकीरीचे काम शंभूसिंह जाधवरावांनी केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणाकरिता गजापूरच्या खिंडीत शंभूसिंह जाधवराव प्राणपणाने लढले होते. याच लढाईत शंभूसिंह जाधवराव ठार झाले होते. त्यानंतर त्यांचाच मुलगा धनाजी जाधवराव यांनी छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठ्यांचा स्वतंत्र लढा लढविला व आपले स्वराज्य वाचवले होते. संताजी जाधव यांचे पुत्र शंभूसिंह जाधवराव यांनी आपले बलिदान देऊन स्वराज्यासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले होते. 

लखुजीराजांच्या वंशातील कर्तबगार पुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यनिर्मितीच्या कामी अत्यंत मोलाची साथ दिली होती. पुढे अचलोजींच्या पत्नी आपले पुत्र संताजी यांच्यासह जिजाऊंच्या आश्रयाला आल्या. लखुजीराजे यांचे बंधू जगदेवराव मुघलांना जाऊन मिळाले. लखुजीराजे यांचे मारले गेलेले पुत्र रघोजी, नातू यशवंतराव यांच्यापैकी एकाचे वंशज सातारा जिल्ह्यातील भुईंज येथे स्थायिक झाले. 

पुढे जिजाऊसाहेबांनी आपली नात म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांची दुसऱ्या क्रमांकाची कन्या राणूआक्का यांचा विवाह अचलोजी जाधवरावांशी मोठ्या धूमधडाक्यात राजगडावर लावून दिला. पुढे अचलोजीराजे जाधवराव व राणूआक्का यांना सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील जहागिरी देऊन राजांनी त्यांचा जणू गौरवच केला. या विवाहामुळे माँसाहेबांनी आपले माहेर, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आजोळ नव्या नात्याने जवळ केले. या राणूआक्कांचे वास्तव्य भुईंज येथेच होते. जाधवरावांची प्रमुख घरे भुईंज, माळेगाव, वाघोली येथे स्थायिक झाली. 

छत्रपती शाहू महाराजांच्या काळात भुईंजचे रायाजीराव जाधव हे महत्त्वाचे सरदार होते. रायाजीरावांना भुईंजसह नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी, महालगाव व पिंपळगाव येथील पाटीलकी व इनाम जमिनी होत्या. शाहू महाराजांच्या काळात आपल्या पराक्रमाने रायाजींनी अनेक अधिकार मिळवले. ह्यात गंगापूर महालाची चौथाई वसुली, राहुरी आणि अंमळनेरचा मोकासा आणि संपूर्ण निरथडी प्रांतातील सरंजामासाठीची नेमणूक व पाटीलकी वतनाचे उत्पन्न मिळून रायाजीरावांना १५ लाख रुपयांचा एकूण सरंजाम होता. 

छत्रपती शाहूराजांच्या राज्य विस्ताराच्या मोहिमेत रायाजीराव लढायांवर जात असत. पेशवे पहिले बाजीराव व हैदराबादचा निजाम यांच्यात पालखेड येथे पहिला संग्राम घडला. यात बाजीरावाने निजामाच्या सैन्याला चारही बाजूंनी घेरून कोंडले. यातून सुटण्यासाठी हल्ले करणाऱ्या निजामाच्या सैन्याविरुद्ध लढताना रायाजीराव २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेड येथे लढाईत धारातीर्थी पडले. निजाम अखेर शरण आला; पण मराठेशाहीने एक महत्त्वाचा मोहरा गमावला. छत्रपती शाहू महाराजांनी रायाजीरावांचे पुत्र खंडोजीराव यांना १७३३मध्ये दिलेल्या सनदेत वरील सरंजामाचे नूतनीकरण करून दिले. 



भुईंजमध्ये रायाजीरावांची भव्य दगडी बांधकामाची, काहीशा अनोख्या शैलीची समाधी आहे. कोरीव कामाने सजविलेल्या ह्या समाधीचे बांधकाम लखुजीराजे यांच्या समाधीची शैली व मराठेकालीन बांधकामाचे मिश्रण आहे. गावाच्या विस्तारात समाधी चारही बाजूंनी झालेल्या बांधकामात झाकाळून गेली आहे. समाधीच्या अंतर्भागात शिवपिंडीमागे रायाजीरावांची पत्नीसह मूर्ती आहे. त्यांच्या पत्नी बहुधा सती गेल्याने या दाम्पत्याची एकत्रित मूर्ती स्थापन केली असावी. गावात जाधवरावांचा जुना वाडा असून, भुईंजचा रामनवमीचा उत्सव प्रसिद्ध आहे. आजही भुईंज येथील वाडा इतिहासाच्या पाउलखुणा जपत मोठ्या दिमाखात उभा आहे. राणूआक्का व रायाजीरावांचे वंशज महेंद्रसिंह ऊर्फ भय्यासाहेब जाधवराव आजही येथे वास्तव्यास आहेत. 

अशा या शौर्यशाली रायाजीराव जाधवरावांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा!

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IULZCV
Similar Posts
शिवपत्नी महाराणी सईबाई पाच सप्टेंबर १६५९ रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निजधामाला गेल्या. आज त्यांचा स्मृतिदिन.
शूरवीर दत्ताजी शिंदे दत्ताजी शिंदे हे अत्यंत शूर व पराक्रमी होते. उत्तरेत लाहोरचा बंदोबस्त दत्ताजी शिंदे यांनीच केला होता. त्या वेळी उत्तरेतील तीर्थक्षेत्रे मुक्त करून आणि बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी दत्ताजी शिंदे यांनी पैसा उभा केला होता. मराठ्यांच्या उत्तरकालीन इतिहासात शिंदे घराण्याचे फार मोठे योगदान आहे
दुसरे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले (सातारा) साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांचा १४ ऑक्टोबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू महाराज १८ मे १६८२ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना पुत्ररत्न झाले. हेच पुढे थोरले शाहू म्हणून इतिहासात अजरामर झाले. १५ डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language